कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक: महाविकास आघाडी सुसाट

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकीत बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होत असतानाच आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरही महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. तर दुसरीकडे भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे सर्वच महसूल विभागात भाजपाचा पराभव होत असताना नागपूर मधील बालेकिल्ल्यातही भाजपाला आपला उमेदवार निवडून आणता आलेला नाही.

शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भाजपाने ताकद लावली होती. बाजार समितीवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे वर्चस्वाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न भाजपाने केला . मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अपयश आले. 18 पैकी 16 संचालकांच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.