Corona Update: दिवसभरात नवीन १५० रुग्ण,१२ मृत्यू,राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १०१८ वर तर मृतांचा एकूण आकडा ६४ !

मुंबई – राज्यात आज १५० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १,०१८ झाली आहे. आज राज्यात १२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कोविडबाधित रुग्णांमध्ये इतरही आजार आढळले आहेत. आज झालेल्या मृत्यूपैंकी ६ मुंबईत, २ पुण्यात तर प्रत्येकी १ मृत्यू नागपूर सातारा आणि मीरा भाईदर येथे झाला आहे.

कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६४ झाली आहे.

१) आज सकाळी मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणा-या एका ६७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. त्यांनी परदेश प्रवास केलेला नव्हता.
२) आज सकाळी मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणा-या एका ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. त्यांनी परदेश प्रवास केलेला नव्हता.
३) आज सकाळी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा आजाअर असल्याने डाएलिसिसवर असणा-या असणा-या एका ६७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. त्यांनी परदेशप्रवास केलेला नव्हता.
४) काल संध्याकाळी मधुमेह असणा-या एका ६८ वर्षीय पुरुषाचा इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे मृत्यू झाला.
५) मुंबईतील एका ७२ वर्षीय महिलेचा आज सकाळी के ई एम रुग्णालयात मृत्यू झाला.या महिलेला उच्च रक्तदाब आणि हायपोथायरॉडिझमचा त्रास होता.
६) फुप्फुसाचा क्षयरोग असणा-या एका ४८ वर्षीय महिलेचा ४ एप्रिल रोजी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मृत्यू झाला.
७) हिरा कंपनीत काम करणा-या एका ५५ वर्षीय कामगाराचा काल संध्याकाळी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
८) मधुमेह, उच्च रक्तदाब असणा-या एका ६७ वर्षीय पुरुषाचा काल मुंबई पोर्ट हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यांची बायपास शस्त्रक्रिया झालेली होती.
९) बोरिवली येथील ६६ वर्षीय पुरुषाचा काल संध्याकाळी मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
१०) मीरा भाईदर येथील ६० वर्षीय पुरुषाचा बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात आज मृत्यू झाला.
११) आग्रीपाडयातील मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणा-या ६८ वर्षीय पुरुषाचा मुंबईत मृत्यू झाला.
१२) सातारा येथील जिल्हा रुग्णालयात एका ६३ वर्षीय पुरुषाचा काल सकाळी मृत्यू झाला. हा रुग्ण अमेरिकेहून आला होता.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २०,८७७ नमुन्यांपैकी १९,२९० जणांचे प्रयोगशाळा नमुनेकरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १,०१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ७९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४,६९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४,००८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे.

आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी २३ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, बुलढाणा जिल्ह्यात ६ आणि प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली, जळगाव आणि वाशीम मधील आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनर्मेट कृति योजना अंमलात आणण्यात येत आहे. सध्या साता-यात २१४ सर्वेक्षण पथके काम करत आहेत तर हिंगोलीत १४, सांगलीत ३१, रत्नागिरीमध्ये ३९ आणि जळगावमध्ये ४८ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण ३,४९२ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १२ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.