
नवी मुंबई- भाजीपाला, फळफळावळ याची प्रचंड उलाढाल होत असलेले वाशीमधील मार्केट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले.
पुण्यातील गुलटेकडी मुख्य बाजार, खडकी, मोशी उप बाजार बेमुदत बंद झाले आहेत.
त्यापाठोपाठ आता वाशी येथील मार्केटही आजपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येत आहे.
वाशीतील मार्केटमध्ये ग्राहक आणि शेतकऱ्यांची मिळून रोज किमान पंधरा ते वीस हजार जणांची गर्दी असते. सध्याच्या साथीच्या काळात ती टाळणे अशक्य असल्याने हे मार्केट बंद ठेवणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी म्हटले आहे.
वाशी बाजार समितीच्या अंतर्गत धान्य, मसाला, कांदेबटाटे, भाजीपाला, फळे अशी पाच मार्केट्स आहेत. यापैकी कांदेबटाटे, फळे आणि भाजीपाला मार्केट बंद रहाणार आहेत.
मात्र धान्य आणि मसाला मार्केट चालू राहील असे समितीने स्पष्ट केले आहे.
शेतकरी आपला माल थेट मुंबईत नेऊन विकू शकतील त्यामुळे भाजीपाल्याची टंचाई जाणवणार नाही असा समितीचा दावा आहे.
दरम्यान नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने सर्व भाजी-फळ मार्केट आणि दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका,नगरपरिषद, नगर पंचायत क्षेत्रामध्ये हा आदेश लागू करण्यात आला आहे. (10 एप्रिल 2020 ) रात्री 12 वाजल्यापासून ते पासून मंगळवार 14 एप्रिल 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत भाजी मार्केट-दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.






