Corona update: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १७६१ तर मृतांचा आकडा १२७ वर

मुंबई – महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आज त्यात १८७ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १,७६१ झाली आहे. राज्यातील मृतांचा आकडा १२७ वर जाऊन पोहचला आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ३१ हजार ८४१ कोरोना निदान चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
एकूण कोरोनाबाधित रुग्ण १,७६१ आहेत. त्यापैकी १,४४६ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण १८८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यातील मृतांचा एकूण आकडा १२७ झाला आहे.

राज्यात काल कोरोनाबाधितांची संख्या १,५७४ होती. त्यात आज १८७ ने वाढ झाली. एकट्या मुंबईत आज १३८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे.

मुंबईतील संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. कालच्या दिवसात राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१० ने  वाढला होता. हा आतापर्यंतचा एका दिवसातील उच्चांक होता. मात्र, आज ही वाढ तुलनेत कमी असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १,१८२ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत एकट्या मुंबईत करोनाची लागण झाल्याने ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या ११ जणांचा मृत्यू आज झाला त्यापैकी १०जणांना इतर आजारांनीही ग्रासले होते. तसेच त्यांचे वयही झाले होते.