
मुंबई – दिवसभरात आज राज्यात 221 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 1982 झाली आहे.
राज्यात आज दिवसभरात 22 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी मुंबईचे 16, पुणे येथील 3 तर नवी मुंबईचे 2 आणि सोलापूरचा 1 आहे. आज
झालेल्या मृत्यूपैकी 13 पुरुष तर 9 महिला आहेत. आज झालेल्या 22 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत 15 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत तर एकजण 40 वर्षापेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 22 पैकी 20 रुग्णांमध्ये (91 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता. कोरोना (कोविड 19)मुळे राज्यात झालेल्या मृत्यूची संख्या आता 149 झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४११०९ नमुन्यांपैकी ३७९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २१७ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१,२४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ३७ जण करोना बाधित आढळले आहेत.
यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत ३ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा ,हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगरयेथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४८४६ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १७.४६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एकाच घरातील त्यांच्या सहवासातील २६ जण करोना बाधित आढळले होते. यातील २४ जणांना आता पर्यंत घरी सोडण्यात आले आहे. इस्लामपूरातील या भागात ३१ सर्वेक्षण पथकांनी मागील २ आठवडे साडेसात हजाराहून अधिक लोकसंख्येचे नियमित सर्वेक्षण केले आहे.






