इंग्लंडच्या हॉकी टीमची ३५-४० डिग्री तापमानामध्ये वर्ल्डकपची तयारी; दुखाापत टाळण्यासाठी प्रचंड मेहनत

इंग्लंडच्या टीमची हॉकी वर्ल्डकपसाठीची तयारी आता शेवटच्या टप्यात आहे.भारतातील भुवनेश्वर येथे २८ नोव्हेंबरपासून हॉकीच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ कसून मेहनत घेत आहे. यासाठी बिशमच्या एबे नॅशनल स्पोर्ट‌् सेंटरवर खास प्रशिक्षण आणि सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले.


याठिकाणी इंग्लंड संघातील खेळाडू हे ३५ ते ४० डिग्री तापमानामध्ये सराव करताना दिसतात. याच्या आधारे हे खेळाडू भारतामधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कारण, नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान भुवनेश्वर येथील तापमान हे ३२ ते ३५ डिग्री असते. याचा आपल्या संघातील खेळाडूंना धोका निर्माण होऊ नये, याचीच सध्या इंग्लंडकडून खास खबरदारी घेतली जात आहे.
भुवनेश्वर येथे २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान हॉकीची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली. इंग्लंडच्या टीमने पहिल्यांदा भुवनेश्वरचा दौरा केला. त्यादरम्यान प्रचंड उष्णतेमुळे इंग्लंडचे चार ते पाच खेळाडू आजारी पडले. पुन्हा असा धोका निर्माण होऊ नये, याची खबरदारी आता इंग्लंडचा संघ घेत आहे. यामुळे स्पर्धेदरम्यानचा धोकाही टाळता येईल, असा विश्वास व्यवस्थापकांनी व्यक्त केला.