पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

भारतातील कोरोनाविरोधातील लढा हा जनताकेंद्री, देशात महायज्ञ सुरु असल्याची स्थिती, प्रत्येक जण आपल्या सामर्थ्य ओळखून लढा देत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आपल्या मन की बात या आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या संदेशात पंतप्रधानांनी कोरोना विरुद्धच्या लढाईमधील देशपातळीवर होत असलेल्या अनेक गोष्टींविषयी उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले, तुमच्या हृदयातील भावना कोरोनाविरोधातील लढाईला बळ देत आहेत, कोणी मास्क बनवतं, कोणी सबसिडी सोडत आहे, कोणी पेन्शन तर कोणी पुरस्काराची रक्कम पीएम निधीला देत आहे . केंद्र आणि राज्य सरकार यांचा प्रत्येक विभाग एकत्र येऊन काम करत आहे, नागरी उड्डाण आणि रेल्वे विभागातील कर्मचारी सहभागी, 500 टन वैद्यकीय साहित्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवत आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अनेकांच्या खात्यात थेट रक्कम जमा करीत आहे. डॉक्टर, नर्स, निमवैद्यकीय क्षेत्र अशा कोविड वॉरिअर्सवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करण्यासाठी अध्यादेश आणला आहे.

याशिवाय पंतप्रधान म्हणाले की, कोरोना संकटात भारताने इतर देशांना औषधं दिली नसती, तर कोणी दोष दिला नसता, मात्र आपण प्रकृती-विकृती न मानता संस्कृतीचं दर्शन घडवलं आणि औषधांची मदत पोहोचवली, भारताच्या आयुर्वेद आणि योग यांची चर्चा देशभरात होत आहे. मास्क म्हणजे आजारपणा नाही, मी तर गमछा वापरण्याचा सल्ला देतो, मास्क हे सभ्य समाजाचं लक्षण आहे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे दुष्परिणामही समजत आहेत.