मुंबईकर चाकरमानी व गावामध्ये दरी निर्माण करण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार

समन्वय नसल्यामुळे सरकार कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अपयशी

▪️विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची जहरी टिका

रत्नागिरी/प्रतिनिधी – कोकणातल्या ज्या भूमिपुत्रांच्या जोरावर शिवसेना मोठी झाली त्याच शिवसेनेने कोकणच्या चाकरमान्यांकडे दुर्लक्ष केले. तसेच येथील कोरोनाच्या परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांसाठी मोफत किंवा पैसे देऊन एसटी देण्याबाबत देखील राज्य सरकारकडून काहीही प्रयत्न करण्यात आले नाही. त्यामुळे आज गाव आणि मुंबईतील चाकरमानी हा येथील नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या विसंवादाला महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी सांगितले की, कोकणातील व्यवस्था पाहण्याबाबत दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना अपयशी ठरली आहे. या ठिकाणी आरोग्य यंत्रणेची देखील दुरावस्था आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री इथे येत नाही आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री इथे बसून सारी व्यवस्था पाहतात अशी शब्दात दरेकर यांनी शिवसेनेवर टोला लगावला.

दरेकर यांच्यासोबत माजी मंत्री व आमदार रविंद्र चव्हाण आमदार निरंजन डावखरे, आमदार भाई गिरकर, आमदार रमेश पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रसाद लाड,माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होते. यावेळी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, रत्नागिरीमधील रुग्णांनास्वॅबच्या चाचणीसाठी मिरज येथील सेंटरला जावे लागायेच, पण यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर आठ दिवसात रत्नागिरीमध्ये स्वॅब सेंटर उभारण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे. यांसदर्भात आवश्यक परवानगी व यंत्र सामुग्रीची व्यवस्था करुन रत्नागिरी येथील वालावलकर रुग्णालय येथे स्वॅब सेंटर आठ दिवसात सुरु करण्यात येईल. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही स्वॅब सेंटरची परवानगी अपेक्षित असल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.

मुंबईकर व गाव असे वादाचे चित्र तयार सध्या ऊभे केले जात आहे.मुंबईकर चाकरमानी व गाव यांचे वेगळे नाते आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कुठलीही कटुतेची दरी निर्माण होता कामा नये. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवासांपूर्वी जनतेशी संवाद साधताना जिल्हा व तालुका स्तरावर आम्ही क्वारंटाईन सेंटर सुरु करु शकलो नाही अशी कबुली दिली व त्यामुळे तुम्ही गावी जाऊ नका असे आवाहन केले. त्यामुळे हे सरकारचे अपयश गावक-यांच्या माथी मारु नका. मुंबईकर चाकरमानी व गाव असा वाद होता कामा नये असे सांगतानाच या दोघांमध्ये यापुढे सलोख्याचे वातावरण कसे राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचना येथील स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्याची माहितीही प्रविण दरेकर यांनी दिली.

राज्यातील मजुरांना विशेष ट्रेनने स्वगृही आणण्यात आले. परंतु, चाकरमान्यांच्या घरवापसीसाठी कोणतीही सोय सुविधा उपलब्ध नाही. चाकरमान्यांना न्याय देण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याची टीका करताना श्री.दरेकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे फक्त भावनिक बोलायचं आणि घोषणा करायचे काम सुरू आहे. परप्रांतीय मजुरांना स्वगृही जाण्यासाठी मानवतेच्या भावनेतून मदत करण्यात आली. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु, ज्या भूमिपुत्रांसाठी सरकारने मोठ्या घोषणा केल्या आज या भूमिपुत्रांची बिकट अवस्था आहे.