मुंबईतील हजारो परप्रांतीय मजूर रेल्वे स्टेशन बाहेर येऊन थांबले, राज्य आणि केंद्र सरकारची तू तू मैं मैं सुरूच

मुंबई:

मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर आणि कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेर रात्री उशीरापर्यंत मोठी गर्दी झाल्यावर पुन्हा या घरी जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा प्रश्न समोर आला.

दिवसभर गाड्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाण्याचं नियोजन होतं. पण काही गाड्या रद्द्द झाल्याचं समजल्यानं गोंधळ सुरु झाला आणि सोशल डिस्टंसिंगच्या काळात बेबंद गर्दी उशीरापर्यंत रेल्वे स्टेशनबाहेर जमत राहिली. बुधवारीही अशा गर्दीच्या बातम्या मुंबईतून आल्या.

राज्य सरकारचं म्हणणं आहे की रेल्वे मंत्रालयानं ज्या राज्यांत गाड्या पाठवता येणार नाही आहेत त्या गाड्यांची सोय करून महाराष्ट्राची फजिती केली तर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी गाड्या जास्त आहेत पण राज्य सरकार प्रवाशांनाच आणत नसल्यानं गाड्या रिकाम्या जाताहेत असं म्हटलं आहे. या राजकारणात हजारो श्रमिक प्रवाशांची परवड मात्र होते आहे.