
मुंबई – रेल्वे सुरू करण्यात आल्याने मुंबई महापालिकेच्या ‘अत्यावश्यक’ सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारपासून बेस्ट बस सेवा बंद करण्यात येत आहे. वांद्रे येथील के. बी. भाभा रूग्णालयाने यासंबंधी पत्रक प्रसिद्ध करून आपल्या कर्मचाऱ्यांना सूचित केले आहे.पालिकेतील सर्वच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही हाच नियम लागू असल्याचे सांगितले जाते आहे.
कोरोनाच्या संकटात काम करण्यासाठी अधिक मनुष्यबळ आवश्यक असल्याने पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. कामावर हजर न झाल्यास ७२ तासात बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यालयातील संख्या वाढू लागली आहे.
लाॅकडाऊनमुळे वाहतुकीची इतर साधने उपलब्ध नसल्याने कामाच्या ठिकाणापासून दूरवर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाने दहिसर, विरार, पनवेल, कल्याण या ठिकाणाहून व रूग्णालय ते हाॅटेल बेस्ट बससेवा सुरू केली होती.
मात्र १५ जूनपासून रेल्वेसेवा सुरू करण्यात आल्याने १९ जूनपासून बससेवा बंद करण्यात येत असल्याचे बेस्ट उपक्रमाने ईमेलद्वारे कळवले आहे, अशी माहिती भाभा रूग्णालयातर्फे एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.






