T20 मालिका: भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय

इंदूर: भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यानच्या टी-२० इंटरनॅशनल सामन्यांच्या मालिकेतला मंगळवारचा दुसरा सामना भारताने जिंकला. ७ गडी राखून टीम इंडियाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आणि या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. 

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेच्या कुशल परेरा (३४), धनुष्का गुणतिलका (२०) आणि आविष्का फर्नांडो (२२) या फलंदाजांच्या जोरावर संघाने १४३ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. शार्दुल ठाकूरने तीन विकेट्स घेतल्या तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी एकेक विकेट मिळाली.

भारतासाठी लोकेश राहुलने ४५, श्रेयस अय्यरने ३४, शिखर धवनने ३२ आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद ३० धावा कुटल्या. कर्णधार विराट कोहलीने १८ व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर विजयी षटकार लगावला.

इंदुरच्या होळकर स्टेडिअममध्ये हा सामना सुरू होता.

मालिकेतला पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. आता हा दुसरा सामना जिंकत भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अंतिम सामना पुणे येथे १० जानेवारी रोजी होणार आहे.