भारत -चीन संघर्षावर माजी पंतप्रधानांनी सोडले मौन; मोदींना दिला सल्ला

नवी दिल्ली : लडाखमधील गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत एका कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले होते. चीनकडून भारतावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर विरोधी पक्ष काँग्रसकडून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोपांच्या फैरी झडत आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारत चीन संघर्षावर मौन सोडले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘देशाची सुरक्षा आणि सामरिक मुद्यांवर जपून बोलावे’, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी दिला.

मनमोहन सिंग म्हणाले, १५-१६ जून रोजी भारताच्या २० शूर जवानांनी लडाखच्या गलवान खोऱ्यात बलिदान दिले. या जवानांनी आपले कर्तव्य धैर्याने पार पाडले. आणि देशासाठी प्राणाची आहुती दिली. या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाचे रक्षण केले. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जावू देणार नाही. आणि ही वेळ एकजुटीने लढण्याची आहे. सर्वांनी एकत्र येऊन चीनला उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन मनमोहन सिंग यांनी केले.

देशाची सध्याची परिस्थिती ही इतिहासाच्या एका नाजूक मार्गावर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणासंदर्भात मनमोहन सिंग म्हणाले, जे देशाचे नेतृत्व करत आहेत त्यांच्या खाद्यावर कर्तव्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्या लोकशाहीमध्ये ही जबाबदारी देशाच्या पंतप्रधानांची आहे. देशाच्या सुरक्षेवर आणि जगाच्या व ऐहिक हितसंबंधांवर होणाऱ्या परिणामांविषयी बोलताना आणि घोषणा करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे सल्ला वजा आवाहन मनमोहन सिंग यांनी मोदींना केले आहे.

एप्रिल महिन्यापासून चीनने अनेकवेळा गलवान खोरे आणि पॅनगोंग त्सो सरोवर भागात घुसखोरी केली आहे. यासंदर्भात बोलताना मनमोहन सिंग म्हणाले, चीनच्या धमकी आणि दबावापुढे आम्ही झुकणार नाही. आम्ही कोणत्याही तडजोडीस बळी पडणार नाही. तसेच, पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला विंनती आहे की, आलेल्या संकटाचा सामना करावा. कर्नल बी. संतोष बाबू यांच्यासह बलिदान दिलेल्या २० जवानांचे बलिदान वाया घालवू नका. तसे झाले नाही तर तो विश्वासघात ठरेल. असे वक्तव्य मनमोहन सिंग यांनी केले.