
मुंबई: राज ठाकरे यांनी आज आपल्या भाषणातून हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही दिले. तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोर मुसलमांनाना भारतातून हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.
पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुंबईतल्या आझाद मैदानात मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चात मोठ्या ताकदीनं सहभागी व्हा, असं आवाहन राज यांनी मनसे सैनिकांना केलं. राज ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीलाही पाठिंबा दिला.
गोरेगाव येथे नेस्को मैदानावर मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनला संबोधित करताना राज ठाकरे यांची तोफ धडाडली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो… अशी साद घालतच राज यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेची भूमिका स्पष्ट केली. मी मराठी आहे आणि हिंदूही आहे. धर्मांतर केलेलं नाही. माझी भाषणं तपासा त्यातही तेच ऐकायला मिळेल. हे काही मी आज बोलत नाही. मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर धावून जाईल आणि माझ्या धर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर धावून जाईल, असा इशारा देतानाच माझा कोणताही वैचारिक गोंधळ नाही. माझे विचार सरळ आणि स्वच्छ आहेत, असं राज म्हणाले.
देशाशी प्रामाणिक असलेले मुसलमान आमचेच आहेत. आम्ही माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम, क्रिकेटपटू झहीर खान आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना नाकारू शकत नाही. मात्र इथे कुणी धिंगाणा घातला तर आम्ही आडवे जाणारच, असं सांगतानाच प्रत्येकानं आपला धर्म घरातच ठेवावा. मशिदीवर भोंगे हवेतच कशाला. आमची आरती जर तुम्हाला त्रास देत नसेल तर नमाजचा त्रास का? नमाजाचे पठण जरूर करा. त्यासाठी भोंगे हवेत कशाला? असा सवालही त्यांनी केला.






