
भारताच्या राष्ट्रीय स्तरावरील फर्स्ट क्लास क्रिकेटची सर्वात मोठी टुर्नामेंट रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) यावर्षी न खेळवण्याचा मोठा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला आहे. 87 वर्षांच्या इतिहासात रणजी ट्रॉफी रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीसीआयकडून अंडर 19 साठी विनू मांकड ट्रॉफी (Vinoo Mankad Trophy) अंतर्गत राष्ट्रीय वनडे टुर्नामेंट खेळवण्यात येणार आहे. तर महिलांसाठी 50 ओव्हरची राष्ट्रीय टुर्नामेंट खेळण्यात येणार आहे, असे बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी सांगितले.
कोविड-19 संकटामुळे आपला खूप वेळ वाया गेला असून या परिस्थितीमध्ये क्रिकेटचे वेळापत्रक आयोजित करणे खूप कठीण आहे, असे शाह म्हणाले.
रणजी ट्रॉफी रद्द झाल्यामुळे रणजीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्यात येईल. देशपातळीवरील खेळाडूंचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये, यासाठी बोर्डाकडून योजना आखली जाईल. यासोबतच सर्व राज्यांनी यशस्वीरीत्या सय्यद मुश्ताक अली टी-20 टुर्नामेंट पार पाडल्यामुळे आभार मानले.











