नाना पटोले अखेर महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विराजमान

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगत होती. अनेक जणांची नावे यादीत होती. या सगळ्या नावांना पाठी टाकत नाना पटोले अखेर महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत. आज (५ फेब्रुवारी) कॉंग्रेसकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नाना पटोले हे विदर्भातल्या साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी भाजपच्या उमेदवारीवर प्रफुल्ल पटेलां सारख्या दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचा पराभव केला आणि ते ‘जायंट किलर’ ठरले. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर आक्षेप घेत त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आले. विद्यार्थी दशेपासूनच ‘नानाभाऊ’ म्हणून ओळख होती. आक्रमक, ओबीसी नेता म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार ही पदेही भूषवली आहेत.

२०१७ ला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर नाराजी व्यक्त करत जाहीर टीका केली होती. शेतकरी व इतर मागासवर्गाच्या प्रश्नांवर लोकसभा सदस्य व भाजपमधून राजीनामा दिला होता.त्यानंतर त्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये घरवापसी केली होती. घरवापसी केल्यानंतर अखिल भारतीय कॉंग्रेस किसान सेलच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली होती. २०१९च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपूरमधून केंद्रीमंत्री  नितिन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, यात पटोले यांचा पराभव झाला होता. ओबीसी बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळेच त्यांची ओळख आक्रमक नेता अशी झाली होती.