मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर वाढला; वाहतूक व्यवस्था विस्कळीत, रेल्वे सेवा कोलमडली!

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे रात्रीपासून कोसळणारा मुसळधार पाऊस अजूनही सुरूच असून पहाटेपासून पावसाने अधिक जोर धरल्याने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसाचा फटका मुंबईतील तिन्ही रेल्वे वाहतुकीला बसला असून मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाइन्स रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे.

सायन-माटुंग्यात रेल्वे रुळावर पाणी; सायनच्या गांधी मार्केट परिसरात पाणी साचले असून परिसराला तलावाचे स्वरूप.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीवर परिणाम झाला असून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई-ठाण्यासह, पालघर, कोकण आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले. परिणामी बलसाड फास्ट, फ्लाइंग राणी या गाड्या रखडल्या आहेत. अवध एक्स्प्रेसही पालघर स्थानाकात रखडली आहे. शिवाय, अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने पालघर-सफाळे, बोईसर-पालघर हे रस्ते बंद झाले आहेत.

नवी मुंबईत ही रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असून तुर्भे, घणसोली, सानपाडा, नेरुळ येथील सखल भागात पाणी साचले आहे. मुंबई – पनवेल महामार्गावरही अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे तसेच काही ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.