T20 : भारताचा इंग्लंड वर 3-2 असा मालिका विजय, शेवटच्या सामन्यात भारताचा 36 धावांनी विजय

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत अखेर यजमान टीम इंडियाने (Team India) 36 धावांनी बाजी मारली. मालिकेच्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात भारताने रोहित शर्मा-विराट कोहली (Virat Kohli) यांची अर्धशतकी खेळी आणि सूर्यकुमार यादव-हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर 224 धावांचा डोंगर उभारला.

याच्या प्रत्युत्तरात इंग्लंड (England) संघ निर्धारित ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 188 धावांवर ढेर झाला.

अशाप्रकारे यजमान संघाने 3-2 ने मालिका काबीज केली. इंग्लंडकडून डेविड मलानने (Dawid Malan) सर्वाधिक 68 धावा केल्या तर जोस बटलर (Jos Buttler) 52 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. बेन स्टोक्सने 14 आणि क्रिस जॉर्डनने 11 धावा केल्या. 

दुसरीकडे, यजमान भारतीय संघासाठी वेगवान गोलंदाजांनी संघाच्या विजयात मुख्य भूमिका बजावली. शार्दूल ठाकूरला 3, भुवनेश्वर कुमारला 2 विकेट मिळाल्या तर हार्दिक आणि टी नटराजनने प्रत्येकी 1 गडी बाद केला. 

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर आता दोन्ही संघात 23 मार्चपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. पुणेच्या गहुंजे स्टेडियमवर सर्व तीन सामने आयोजित केले जाणार आहेत.