Letter Bomb: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ट्विटरद्वारा तात्काळ खुलासा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मोठ्या गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली आहे. यात थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. तसेच या भ्रष्टाचाराबाबत आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही माहिती दिल्याचा खळबळजनक दावा परमबीर सिंह यांनी केलाय.

IPS परमबीरसिंह म्हणतात, मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं. एवढच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं.

सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकिय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सुचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते. एवढच नाही तर शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत, आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहीलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच्या भेटीनंतर सचिन वाझे हे त्याच दिवशी माझ्या ऑफिसला आले आणि मला देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल सांगितलं. मला त्याचा धक्का बसला. खरं तर मी ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार करत होतो.

काही दिवंसापूर्वी सोशल सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना अनिल देशमुख यांनी त्यांच्या मुंबईतील शासकीय निवास्थानी बोलवून हुक्का पार्लर विषयी चर्चा केली. त्याबैठकीला इतर अधिकारी आणि अनिल देशमुख यांचे पीए पलांदे उपस्थित होते. दोन दिवसांनंतर पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या निवास्थानी बैठकीसाठी बोलवण्यात आले. पाटील आणि भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या घराबाहेर थांबवण्यात आलं. त्यावे्ळी पलांदे आत होते. पलांदे यांनी अनिल देशमुख यांच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर मुंबईतील 40-50 कोटी रुपये 1750 बार,हॉटेल मधून जमा होतील, असं पलांदे म्हणाले. संजय पाटील यांनी मला ती माहिती दिली, असं परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे.

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.. 12 व्या मुद्द्यात त्यांनी अनेक गंभीर बाबी स्पष्ट केल्या आहे. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा कऱण्यासाठी टार्गेट द्यायचे. त्या टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून याबाबत त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरून खुलासा केला आहे.