
कोविडचा प्रादुर्भाव पाहता मुंबई उच्च न्यायालयाने व्हर्च्युअल सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 7 मेपर्यंत हायकोर्टात ऑनलाइन सुनावणी घेण्यात येणार आहे. तसा निर्णय हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने घेतला आहे.
कोविड काळात मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. कोविडचा वाढता संसर्ग आणि राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे हायकोर्टाने आपले कामकाज व्हर्च्युअल पद्धतीने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्यातील अन्य न्यायालयांचे काम एकाच सत्रात सुरू राहणार आहे.
मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि अन्य वरिष्ठ न्यायमूर्तींची आज याबाबत एक बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या कालावधीदरम्यान न्यायमूर्तींचे द्विसदस्यीय खंडपीठ मंगळवार आणि गुरुवारी बसणार असून एकल न्यायमूर्ती सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी असे तीन दिवस काम करणार आहेत.






