गोव्यातही चित्रीकरणाचे पॅकअप, कोरोना रुग्ण वाढीने निर्णय

पणजी / देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असताना राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन ‘अंतर्गंत राज्यातील सर्व मालिका आणि सिनेमांच्या चित्रीकरणावर बंदी घातली. त्यामुळे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला होता. परंतु या धक्क्यातून सावरण्यासाठी मालिकांच्या निर्मात्यांनी गोवा, राजस्थान, गुजरात राज्यांमध्ये जाऊन चित्रीकरणाला सुरुवात केली. मात्र, आता गोवा सरकारने राज्यातील सातत्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि स्थानिक नागरिकांचा वाढता विरोध यामुळे अशा चित्रीकरणावर तातडीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यात सुरू असलेली चित्रीकरणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गोवा सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वच वाहिन्या आणि निर्मात्यांवर पुन्हा एकदा चिंतेचे सावट पसरले आहे.

देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.गोव्यातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच गोव्यातील काही ठिकाणी मालिकांचे चित्रीकरण सुरू असल्याने गर्दी वाढली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती . 

 गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी मडगाव येथील फटारडा गावातील रवींद्र भवन येथे सुरू असलेल्या कलर्स वाहिनीच्या ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन ते चित्रीकरण बंद करण्याची मागणी केली होती. तसेच या कार्यक्रमाची चित्रीकरण सुरू असताना कोरोनाचे नियमांचे अजिबात पालन केले जात नसल्याचा आरोप त्यांनी  केला होता . या कारवाईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला तो राज्यात खूपच व्हायरल झाला आहे.