राज्यात लॉकडाऊन कायम , काही निर्बंध शिथिल होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

  • वृत्तसंस्था 
    मुंबई / महाराष्ट्रातला लॉकडाउन १ जून पासून वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.  या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती टोपे यांनी दिली.
  • आज मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्या बाबत बैठकीत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाल्याचे टोपे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्रातील लॉकडाउन या विषयाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज्यात लॉकडाऊन वाढवणार असल्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये लॉकडाउनसंदर्भातली नियमावली जाहीर केली जाईल. मुख्यमंत्र्यांसोबत सर्व मंत्र्यांचे मत सध्यातरी लॉक डाउन उठवू नये असे असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. 

  • महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट जास्त असल्याने सरकार अजूनही सावध भूमिकेत आहे. त्यामुळे लॉकडाउन उठवला जाणार की, कायम ठेवला जाणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. अखेर  लॉकडाऊन संदर्भातील चित्र स्पष्ट झाले. राजेश टोपे यांनी १ जूननंतर महाराष्ट्रातील चित्र कसे असेल, याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली.  राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मंत्रिमंडळाच्या बैठकीत तौक्ते वादळासह पदोन्नती आरक्षणावरही चर्चा झाली. मात्र, या आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असेही राजेश टोपे यांनी सांगितले.