5G Technology विरोधात अभिनेत्री जुही चावला हीची दिल्ली हायकोर्टात धाव

देशात सध्या फाईव्ह जी टेक्नॉलॉजी आणण्याच्या चर्चा सुरू असतानाच त्याविरोधात अभिनेत्री जुही चावला हिने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फाईव्ह जी टेक्नॉलॉजीचे मानवासह पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. आजच्या तुलनेत आरएफ रेडिएशन 10 ते 100 पटींनी वाढेल. त्यामुळे हे तंत्रज्ञान देशात लागू करण्यापूर्वी त्यावर सखोल संशोधन व्हावे, असे जुहीने आपल्या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी प्राथमिक सुनावणी आज न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांच्या खंडपीठासमोर झाली. पुढील सुनावणी बुधवार, 2 जूनला होणार आहे.

याबाबत जुहीने म्हटलेय, आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाविरोधात अजिबात नाही. उलट तंत्रज्ञानाच्या जगातून मिळवलेल्या नवीन उत्पादनांचा आपण सर्वचजण आनंद घेतो. ज्यात वायरलेस कम्युनिकेशनचाही समावेश आहे. परंतु वायरलेस गॅजेट्स आणि नेटवर्क सेल टॉवरबाबत केलेल्या संशोधनातून आम्हाला असे आढळले की, त्यातून निघणारे आरएफ रेडिएशन मानवी आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत हानीकारक आहे.

याचिकेसंदर्भात माहिती देताना तिच्या प्रवक्त्याने म्हटलेय, देशात फाईव्ह जी तंत्रज्ञान लागू करण्यापूर्वी त्याचे मनुष्य, पशुपक्षी, कीटक आणि पर्यावरण यावर होणाऱया परिणामाचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. सध्याच्या नागरिकांसाठी आणि येणाऱया पुढच्या पिढीसाठी सुरक्षित आहे की नाही हे या संशोधनानंतर स्पष्ट केले पाहिजे. त्यानंतरच फाईव्ह जी टेक्नॉलॉजी लागू करण्याबाबत निर्णय घेतला पाहिजे.