दिवसाला 1 कोटी नागरिकांना लस देणार!! केंद्र सरकारची योजना तयार

तिसऱया लाटेपूर्वीच देशातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण करण्याची योजना केंद्र सरकारने बनवली आहे. त्यात दर दिवशी 1 कोटी नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य आहे. येत्या जुलैपासून त्याचा शुभारंभ केला जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. 30 ते 32 कोटी डोस उपलब्ध झाल्यानंतर जुलैच्या दुसऱया किंवा तिसऱया आठवडय़ापासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. या योजनेनुसार कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे 25 कोटी डोस प्रत्येक महिन्याला उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

एप्रिल महिन्यातील आकडेवारीनुसार देशात 75 हजार लसीकरण केंद्रे होती. त्या केंद्रांवर ही योजना राबवण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर दिवसाला 150 नागरिकांना लस दिली तरी 1 कोटी 12 लाख 50 हजार नागरिकांना लस मिळेल. तसेच कोविन अॅपला आणखी एका अॅपची जोड दिली जाणार आहे. या अॅपमध्ये लसीचा क्रमांकही नोंदवला जाऊ शकणार आहे.

जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, स्पुटनिक या दोन लसींचा फक्त एकच डोस दिला जातो. त्याच धर्तीवर कोव्हिशिल्ड लसीचा एक डोस पुरेसा होईल का याचाही अभ्यास केला जात आहे. त्याचप्रमाणे दोन वेगवेगळय़ा लसींचे वेगवेगळे डोस दिले तर किती प्रभावी आणि सुरक्षित ठरू शकतील या दिशेनेही चाचणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.