
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Chmpionship) अंतिम सामना साऊथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडने (New Zealnd) बलाढ्य भारताला (India) 8 विकेटने पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. टीम इंडियाने (Team India) किवी संघासमोर विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य ठेवले होते जे त्यांनी दुसर्या डावात दोन विकेट्स गमावून गाठले.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) 52 आणि रॉस टेलर 47 धावांवर नाबाद राहिला.
भारताचा दुसरा डाव 170 धावांवर कमी झाला. किवी संघाच्या ऐतिहासिक विजयावर क्रिकेट विश्वातून बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय दिग्गज खेळाडूंपासून अनेक विदेशी माजी खेळाडूंनी किवी संघाचे आयसीसीच्या पहिल्या जेतेपदाबद्दल अभिनंदन केले. पाऊस आणि खराब प्रकाशाने बाधित या सामन्याचा निर्णय अखेर सहाव्या, राखीव दिवशी लागला.
दरम्यान, या सामन्यातील 2 दिवस पावसामुळे वाया गेले असल्याने बुधवार, 23 जून राखीव दिवशीही खेळ झाला.

गेल्या चारही आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघाला (Indian Team) न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या स्टार खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण गोलंदाज वगळता फलंदाजांनी मात्र निराशजनक कामगिरी केली आणि संघाच्या पराभवाचे खलनायक बनले.
न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी नाबाद 96 धावांची अर्धशतकी भागीदारी केली आणि न्यूझीलंडला 21 वर्षांनंतर आयसीसीचे विजेतेपद मिळवून दिले.
यापूर्वी न्यूझीलंडने अखेर आयसीसी विजेतेपद 2000 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळवले होते. त्यावेळी देखील किवी संघाने अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभवाची धूळ चारली होती.






