
राज्यातील बहुचर्चित महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आता EDने पहिलीच मोठी कारवाई केली आहे. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता ED केलेल्या या पहिल्या कारवाईमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत येणार असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. ह्याचे कारण असे की, ED ने अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जलंद्रेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जलंद्रेश्वरचा हा साखर कारखाना हा पूर्वी सहकारी साखर कारखाना होता. या कारखान्यावर महाराष्ट्र जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज होते. ते कर्ज फेडू न शकल्याने या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर हा कारखाना ज्यांनी वैयक्तिकरित्या विकत घेतला ते अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे आहेत. त्यामुळे आता ED ने याबाबत कारवाई करण्याचे मुख्य कारण म्हणजेच ‘अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत आहेत’ हेच आहे.
जलंद्रेश्वरचा हा कारखाना साताऱ्यातील एक अत्यंत महत्त्वाचा साखर कारखाना मानला जातो. ह्यावरून अनेकदा राजकारण पेटल्याचेही सांगण्यात येते. एक भावनिक नाते या कारखान्याशी असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, या महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यात अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवल्याचे म्हटले जाते. तसेच त्यानंतर या साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली आहे.






