
सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख (वय ९४) यांचे शुक्रवारी रात्री सोलापुरातील खासगी रूग्णालयात निधन झाले.
विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा दक्षिण भारतातील द्रविड मुनेत्र कळघमचे नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांनी मोडला होता. सांगोला विधानसभा मतदार संघातून ते तब्बल ११ वेळा निवडून आले.
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची नाव कायम आदराने घ्यावे असे सांगोला तालुक्याचे 55 वर्ष ज्यांनी विधानसभेमध्ये नेतृत्व केलं राजकारणातील भीष्म भाई गणपतराव देशमुख यांनी सोलापुरात अखेरचा श्वास घेतला.
तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर होता. साधी रहाणी असणारे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे नेते म्हणून मा. गणपतराव देशमुख यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने राजकीय विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला.
ज्या काळात शिक्षणासाठी वणवण भटकावे लागायचे अशा काळात गणपतराव देशमुख यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. ते वकील झाले. वकिलीची पदवी असताना आणि पदवीच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावता येण्यासारखी संधी असतानाही गणपतरावांना तो मोह आवरला नाही. विद्यार्थी दशेपासून सुरु असलेले शेतकरी कामगार पक्षासोबतचे काम त्यांनी कायम ठेवले. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर सांगोला विधानसभा मतदारसंघातून 1962 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. एकदा आमदार झाल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक निवडणुकांचा अपवाद वगळता सलगपणे 54 वर्षे ते विधानसभेवर निवडूण येत राहिले.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी ट्वीट करत आपले दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ‘कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल.’






