
राज्य सरकारने अद्यापही मंदिरे उघडण्याची (Temples In Maharashtra) परवानगी न दिल्याने विरोधकांनी राज्यात आंदोलन सुरु केले आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी नव्हेतर, कोरोना विरोधात आंदोलन करा, असे उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता विरोधकांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच राज्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशात गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तसेच लसीकरणानंतरही मास्क घालणे आवश्यक आहे. तसेच राज्यात वाढणाऱ्या डेंग्यू आणि मलेरियाच्या आजाराबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. राज्यात मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या रुग्णांच्या प्रकरणातही वाढ होताना दिसत आहे. पण, त्यांची लक्षणे वेगळी आहेत. यामुळे अशा रुग्णांनी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.






