
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने उप-राजधानी नागपुरात (Nagpur) पाऊल ठेवले असून, ती नागपूर मार्गे महाराष्ट्रात वेगाने पसरू शकते अशी भीती आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार आहे, नागपुरात पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
नितीन राऊत हे नागपूरचे पालकमंत्रीही आहेत. नागपुरात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे त्यांनी स्वतः काबुल केले आहे. अशा स्थितीत हा संसर्ग वाढण्यापासून रोखणे अतिशय गरजेचे असल्याने, 3-4 दिवसांत नागपुरात लॉकडाऊन लावण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या परत दोन आकडी झाली आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेवून नागपूर जिल्ह्यामध्ये कडक करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत.
नितीन राऊत म्हणाले की, परिस्थिती पाहता नागपुरात कमीत कमी वीकेंड लॉकडाऊन लागू करणे आवश्यक झाले आहे. यासाठी पुढील 3-4 दिवस परिस्थितीवर नजर ठेवली जाणार आहे. या दरम्यान ते व्यापारी, दुकानदार आणि विविध क्षेत्रांतील लोकांसोबत बोलत आहेत, चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ते माध्यमांशीही बोलणार आहे. प्रत्येकाचे मत जाणून घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल.






