
वृत्तसंस्था
मुंबई / २० ऑक्टोबर पासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे ,अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरू झाल्यानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कोरोनामुळे दीर्घ काळापासून बंद असलेली महाविद्यालये अखेर लवकरच सुरू होत आहेत. मात्र यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काही नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याविषयीची माहिती दिली .
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, २० ऑक्टोबर पासून राज्यातील कॉलेज सुरु होणार आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. महाविद्यालयं सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली असणार आहे. त्या त्या जिल्ह्यातली परिस्थिती पाहून हे ठरवलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांचं लसी करण झाले नाही किंवा एकच डोस झालेला आहे, त्यांच्यासाठी विशेष लसी करण मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ते पुढे म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मध्ये हजर राहता येणार नाही त्यांची ऑन लाईन शिक्षणाची सोय कॉलेजने करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का हा निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असतील. डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर वसतिगृहेसुद्धा टप्प्या टप्प्याने सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले आहेत.






