भारतात कोरोना व्हायरसचा पहिला बळी, कर्नाटकात; महाराष्ट्रात कोरोना बाधित संख्या 14

बेंगलुरु: कोरोनाचा भारतात पहिला बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक राज्य सरकारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.   कर्नाटक राज्य सरकारने गुरुवारी सांगितलं होतं की, या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु यांनी ट्वीट करुन या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती दिली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. तसेच या सर्व संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी व्यवस्था केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 12 झाली आहे. पुण्यात 9, मुंबईत 3, ठाणे आणि नागपुरात एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला आहे. पुण्यातील नऊपैकी सात कोरोनाबाधित हे दुबईला फिरायला गेले होते, तर आठवा रुग्ण त्यांना मुंबई एअरपोर्टवरून पुण्याला घेऊन येणारा ड्रायव्हर होता. तसेच पुण्यातील नववा रूग्ण हा यांच्या संपर्कातील नसून हा रूग्ण एक मार्च रोजी अमेरिकेहून भारतात परतला होता. तसेच ठाण्यातील कोरोनाबाधित रूग्ण फ्रान्सवरून परतला आहे. अशातच मुंबईतील तिसरा कोरोनाबाधित रूग्ण वृद्ध असून तो दुबईवरून परतला आहे.

कोरोना व्हायरस जगातील 111 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसला जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.