
वृत्तसंस्था
मुंबई / मागच्या दोन वर्षांपासून जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या करोनाचा धोका अद्याप कायम आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना याची लागण झाली होती तसेच काहींना या व्हायरसमुळे जीवही गमवावा लागला. अशात आता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये करीना आणि अमृताने अनेक पार्ट्यांना हजेरी लावली असल्यांने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना करोनाची लागण झाली असल्याच्या संदर्भात एएनआयनं ट्वीट केले आहे. दरम्यान या दोघींनीही कोणत्याही करोना नियमांचं पालन न करताच अनेक पार्ट्यांना हजेरी लावल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत.
कोरोना नियमांचं उल्लंघन करून बॉलिवूड पार्ट्यांमध्ये उपस्थित राहिल्यामुळेच करीना आणि अमृता यांना करोनाची लागण झाल्याचं बोलले जात आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही अभिनेत्रींमुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघीही त्यांच्या गर्ल्स गँगसोबत पार्टी करताना दिसल्या होत्या. ही पार्टी अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरच्या घरी देण्यात आली होती आणि त्यात मलायका अरोरा, करिश्मा कपूर या देखील सहभागी झाल्या होत्या.






