
मुंबई : भाजप-शिवसेना युतीवर भाष्य करणे टाळत, ‘राज्यात पूर्ण बहुमताने पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार’, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीचे आज मुंबईतून रणशिंग फुकले. आश्चर्य म्हणजे भाजपा- शिवसेना युतीचा उल्लेख त्यांनी टाळला.
या बरोबरच ‘देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील’, अशी घोषणा करत शहा यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी कलम ३७० वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली.
राज्यात गुंतवणूक, शेती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याला पुढे आणले, असे म्हणत शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस हाच राज्यातील भाजपचा चेहरा असल्याचे अधोरेखित केले.
कलम ३७० हटवण्याला शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने विरोध केल्याचेही ते म्हणाले. गेल्या ५ ऑगस्टपासून काश्मिरात एकही गोळी चाललेली नाही, हेही लक्षात घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.






