ST Bus Strike: अजय गुजर यांच्याकडून संप माघारीची घोषणा, संपकाऱ्यांमध्ये फूट !

मुंबई : अजय गुजर यांनी संपातून माघार घेतल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप नसून आमच्यासाठी दुखवटा आहे. आणि हे आंदोलन कोणत्याही संघटनेचे नाही, जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोवर आमचा लढा सुरू राहणार आहे. हा लढा हा कर्मचाऱ्यांचा लढा आहे अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आझाद मैदानात सध्या थंडीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अनेक आगारातील कर्मचारी आझाद मैदानात आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा संप आणखी तीव्र केल्याचे दिसून येत आहे.

अजय गुजर यांना सरकारकडून काहीतरी मिळाले असेल, म्हणून त्यांना संप मागे घेत असल्याची घोषणा केली असा आरोपही काही एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. अजय गुजर कोणत्या अमिषाला बळी पडले? असा सवाल आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर संपकऱ्यांना कोणतरी भडकवत आहे, उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया अजय गुजर यांनी दिली आहे. तर उद्यापर्यंत एसटी कर्मचारी कामावर हजर होतील, असेही ते म्हणाले आहेत. तर सदावर्ते एक वकील आहेत त्यांनी त्यांचे काम करावे, आम्हाला असचे काम करू द्या, असे गुजर म्हणाले आहेत. मात्र जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोवर कामावर जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

अजय गुजर कोण? आम्हाला माहीत नाही आणि गुणरत्न सदावर्तेंना आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आमच्या मागण्या मान्य करून घेण्याचा अजय गुजर यांना कुणी अधिकार दिला? असा सवालही आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. पुण्यातूनही एसटी कर्मचाऱ्यांनी आम्ही कुठल्याही संघटनेचे सभासद नाही, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनेत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे, त्यानंतर परबांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. विलिनीकरणाच्या मुद्दा त्रिसदस्यीय समिती जो अहवाल देईल तो आम्हा दोघांनाही मान्य असेल असे परबांनी पुन्हा सांगितले आहे. तसेच त्यांनी आमच्याकडे मागण्या केल्या होत्या. त्यानुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला पगार मिळावा ही त्यांची मागणी होती.आम्ही जी मूळ पगारात वाढ करत त्यांना चांगल्या स्थानी नेऊन ठेवलं आहे, असेही परब म्हणाले आहेत. तसेच संपाचा आज 54 वा दिवस आहे, हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. न्यायलयाने संप करू नेय, कामावर हजर व्हा असे बजावले होते, असेही ते म्हणाले आहेत.

एसटी कर्मचारी संघटनेची दुसरी मागणी होती की, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यांच्यावरील कारवाई कामगार कामावर आल्यानंतर मागे घ्यावी. त्यावर कामगार कामावर आले आणि डेपो चालू झाले तर आम्ही कारवाई मागे घेऊ, अशी घोषणा परब यांनी केली आहे. फक्त ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत त्यावर कारदेशीर कारवाई पूर्ण करुनच मागे घेऊ, असंही त्यांनी बजाबले आहे.

त्याचबरोबर वेळेवर पगार मिळाला. 10 तारखेच्या आत पगार व्हावा ती मागमी आम्ही आधीच मान्य केली आहे. अशीही माहिती त्यांनी दिली. यासोबत त्यांच्या ज्या आर्थिक मागण्या होत्या त्यावर चर्चा करण्याची मागणी आम्ही मान्य केली. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांची प्रकरणं आम्ही तपासू, त्यांच्या कुटुंबियांना नोकरी मिळावी हा मुद्दा आम्ही महामंडळासमोर ठेवू आणि तो मान्य करु, असेही परब म्हणाले आहेत. मात्र अजय गुजर जरी बैठकीला हजर असले तरी काही संघटना आणि एसटी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे, त्यामुळे संपात सध्या फूट पडल्याचेही दिसून येत आहे.