सलमानला सर्प दंश, विषारी साप मला तीन वेळा चावला – सलमान खान

सापाने माझा तीनदा चावा घेतला. हा एक प्रकारचा विषारी साप होता. मला 6 तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मी आता ठीक आहे, अशी माहिती खुद्द अभिनेता सलमान खानने दिली आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याला सर्पदंश (snake bite) झाल्याचं वृत्त रविवारी सकाळी आलं आणि चाहत्यांच्या काळजात धस्स झालं. वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी झालेल्या या घटनेमुळे सलमानचे कुटुंबीय आणि मित्र परिवारातही धाकधूक वाढली होती. मात्र चाहत्यांच्या लाडक्या भाईजानला सहा तासांच्या उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. सर्पदंश झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे वाढदिवशी सलमानने मीडियाशी संवाद साधताना आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची भयावह आठवण सांगितली.

माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता, मी काठीने त्याला बाहेर काढले. हळूहळू तो माझ्या हाताजवळ आला. मी त्याची सुटका करण्यासाठी त्याला पकडलं, त्यावेळी त्याने माझा तीनदा चावा घेतला. हा एक प्रकारचा विषारी साप होता. मला 6 तास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मी आता ठीक आहे” अशी माहिती खुद्द अभिनेता सलमान खानने दिली आहे. सापाने मला बर्थडे गिफ्ट दिलं, असंही तो गंमतीत म्हणाला.

सलमान खानचा आज 56 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पनवेलमधील फार्महाऊसवर गेलेल्या सलमानला आदल्याच दिवशी साप चावला होता. त्यानंतर सलमानला नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात (MSG Hospital) काही तास उपचारासाठी थांबावं लागलं होतं. ज्या सापानं दंश केला होता, त्यालाही पकडण्यात आलं आहे.