
प्रत्येक घरात सध्या सर्दी, ताप, अंगदुखीचे रुग्ण आढळत आहेत. हे सगळं व्हायरल इन्फेक्शन असल्याचं जरी सांगितलं जात असलं, तरी या सगळ्यांची टेस्ट केली, तर अर्ध्यापेक्षा जास्त जण कोरोना पॉझिटिव्ह येतील, अशी भीती स्वतः डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.
सध्या शहरातल्या प्रत्येक दवाखान्यासमोर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक घरात सध्या सर्दी, ताप, अंगदुखीचे रुग्ण आढळत आहेत. हे सगळं व्हायरल इन्फेक्शन असल्याचं जरी सांगितलं जात असलं, तरी या सगळ्यांची टेस्ट केली, तर अर्ध्यापेक्षा जास्त जण कोरोना पॉझिटिव्ह येतील, अशी भीती स्वतः डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.
याचं कारण म्हणजे तिसऱ्या लाटेतला हा कोरोना आधीच्या दोन लाटेतल्या कोरोनापेक्षा सौम्य असल्याचं निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवलं आहे. या नव्या कोरोनाचा प्रसार अतिशय वेगाने होत आहे, मात्र त्याची तीव्रता अतिशय कमी असून श्वसन यंत्रणेवरही तो आघात करत नसल्याचं समोर आलं आहे. फक्त दोन ते तीन दिवस ताप, सर्दी, खोकला असा त्रास रुग्णांना जाणवत असून त्यानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होत आहेत. मात्र याच रुग्णांची टेस्ट केली तर ती 100 टक्के पॉझिटिव्ह येईल, असंही मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.
कोरोनाची ही तिसरी लाट येण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरकडे सर्दी तापाचे दिवसाला 50 रुग्ण येत असतील, तर आता ही संख्या 100 वर गेली आहे. त्यामुळे या नव्या कोरोनाचा प्रसार किती वेगाने होतोय, याची तुम्हाला कल्पना येऊ शकेल. मात्र यातली दिलासादायक बाब म्हणजे हा नवा कोरोना धोकादायक नसून तो घरच्या घरीच बरा सुद्धा होण्यासारखा आहे. त्यामुळे डॉक्टर्स सुद्धा टेस्ट करण्याच्या फंदात न पडता आधी रुग्णाला बरं करण्याला प्राधान्य देत आहेत.
दुसरीकडे या लाटेमुळे मेडिकल चालकांकडे डोलो गोळीची मागणी चांगलीच वाढली आहे. ताप आणि अंगदुखीवर डोलो गोळी प्रभावी असल्यानं अनेक जण घरच्या घरीच डोलो आणि अझिथ्रामायसिन घेऊन बरे सुद्धा होत आहेत. तर मागील दोन लाटांप्रमाणे व्हिटॅमिनच्या गोळ्यांना मात्र अद्याप मागणी नसल्याचं मेडिकल चालक सांगतात.
शहरात कोरोनाचा हा वाढता प्रसार पाहता नागरिकांनी सुद्धा आता स्वतःची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नवीन कोरोना घातक नसला, तरी वेगवान नक्कीच आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग हे तीन नियम काटेकोरपणे पाळले, तरी आपला कोरोनापासून बचाव नक्कीच होऊ शकेल.










