IND vs AUS, U19 World Cup 2022:ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव करून चौथ्यांदा फायनलमध्ये धडक; आता इंग्लंडशी होणार अंतिम सामना

वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) अंतिम सामन्यात धडक मारली आहे. अँटिग्वा (Antigua) येथील कुलीज क्रिकेट मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा (Australia) 96 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने (Indian Team) 50 षटकांत 5 गडी गमावून 290 धावा केल्या. सुरुवातीच्या दोन झटक्यांनंतर कर्णधार यश धुल (Yash Dhull) आणि उपकर्णधार शेख राशिदने (Sheikh Rashid) द्विशतकी भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. यश धुलने सर्वाधिक 110 धावा केल्या. उपकर्णधार रशीदने 94 धावांची खेळी खेळली. यश धुल आणि उपकर्णधार शेख रशीद यांनी 204 धावांची भागीदारी करून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर 5 बाद 290 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 41.5 षटकांत सर्वबाद 194 धावांत आटोपला.

अंतिम फेरीत भारताचा सामना 1998 च्या चॅम्पियन इंग्लंडशी होईल. हा सामना 5 फेब्रुवारी रोजी सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. या विजयासह चार वेळचा अंडर-19 चॅम्पियन भारतीय संघ सलग चौथ्यांदा आणि विक्रमी आठव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंडर-19 विश्वचषकात सर्वाधिक वेळा अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. टीम इंडियाने 2000, 2006, 2008, 2012, 2016, 2018, 2020 आणि या वर्षी अंतिम फेरी गाठली आहे. तर भारताने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये विश्वचषक जिंकला होता. याशिवाय 2006, 2016 आणि 2020 मध्ये अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या भारताला स्पर्धेच्या प्रारंभीच कोविड-19 चा फटका बसला आणि दोन सामन्यांसाठी धुल व रशीद या खेळाडूंना बाहेर बसावे लागले. परंतु संघातील सखोलतेमुळे त्यांनी बाद फेरीपर्यंत मजल मारली.