
सरकारी क्षेत्रातील आघाडीच्या स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक अभिनव सुविधा सुरू केली आहे. या सुविधेनुसार या बँकेच्या ग्राहकांना केवळ ओटीपीच्या साह्याने एटीएममधून पैसे काढता येतील. पैसे काढण्यासाठी या ग्राहकांना यापुढे डेबिट कार्डची गरज नसेल. बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी नुकतीच ही घोषणा केली. या बँकेच्या ७० लाख ग्राहकांना या सुविधेचा लाभ होईल. डेबिट कार्ड चोरीला जाणे, ते क्लोन होणे यांसह अन्य आर्थिक फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण होईल, असे बँकेने म्हटले आहे.
स्टेट बँकेने काही महिन्यांपूर्वी या सेवेची घोषणा केली होती. ही सुविधा शनिवारपासून अंमलात आली. स्टेट बँकेच्या १६,५०० एटीएम केंद्रांतील मशिनवर या प्रकारे पैसे काढता येतील. अन्य ६० हजार एटीएम केंद्रांतील मशिनमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात येत असून येत्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत या एटीएममध्येही ही सुविधा उपलब्ध होईल, असे रजनीश कुमार यांनी सांगितले. याचाच पुढचा भाग म्हणून देशभरातील १० लाख कॅश पॉइंट्सवरदेखील ही सुविधा पुरवण्यात येईल. यामध्ये पीओएस (पॉइंट ऑफ सेल – व्यापारी, पेट्रोल पम्प, हॉटेल आदी ठिकाणी असणारी कार्ड पेमेंट यंत्रणा), मायक्रो एटीएम आदी नेहमीच्या एटीएमव्यतिरिक्त असणाऱ्या पेमेंट पर्यायांचा समावेश आहे.











