
नवी दिल्ली: तीन तलाक विधेयकावर आज लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या विधेयकावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना विधेयकाचं जोरकसपणे समर्थन केलं. देशातील महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठीच हे विधेयक सरकारने आणले आहे, असे प्रसाद यांनी नमूद केले.
वादळी चर्चेनंतर तीन तलाक विधेयकमंजूर झाले आहे. चर्चेनंतर या विधेयकावर आवाजी मतदान घेण्यात आले असता विधेयकाच्या बाजूने ३०३ मते पडली तर विरोधात ८२ मते पडली.
मोदी सरकारच्या पहिल्या पर्वातही तीन तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झालं होतं मात्र राज्यसभेत बहुमत नसल्याने या विधेयकाची कोंडी झाली होती. याच अधिवेशनात हे विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.






