
मुंबई: मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई आणि ठाणे येथे संध्याकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय. मुंबईच्या सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक मंदावली आहे. पावसाचा फटका रेल्वेला ही बसला असून रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत.
अंधेरी सबवेत पाणी भरल्याने हा सबवे वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. भांडुपमध्ये एलबीएस मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने पाणी भरले आहे. दादर हिंदमाता, माटुंगा किंग्ज सर्कल या भागातही पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
दरम्यान मुंबईकारांसाठी खुशखबर अशी आहे की मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा आणि मोडकसागर हे तलाव दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईवरील पाणी टंचाईचे संकट दूर होणार आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हांमध्ये काही भागांत मुसळधार तर पालघर जिल्ह्याच्या काही भागांत अतिवृष्टी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून पुढे नमूद करण्यात आले आहे.






