
बंगळुरू: कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मुख्यमंत्रिपदासाठी येडियुरप्पा हाच भाजपचा चेहरा असेल हेही स्पष्ट झाले होते.
राजभवनावर झालेल्या छोटेखानी सोहळ्यात आज येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली आहे. ते राज्याचे २५वे मुख्यमंत्री ठरले. शपथविधीनंतर येडियुरप्पा यांच्यापुढे बहुमताची अग्निपरीक्षा असणार आहे. राज्यपालांनी ३१ जुलैपर्यंत त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.
भाजपकडे १०५ इतकं संख्याबळ असून दोन अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. ते पाहता येडियुरप्पा तूर्त बहुमताची परीक्षा पास होतील, हे जवळपास निश्चित आहे.
कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.






