
मुंबई: काल रात्री उशिरापर्यंत पडलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण जन जीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं. नागरिकांचे हाल हाल झाले. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने रस्ता, रेल्वे आणि हवाई वाहतूक व्यवस्था कोलमडली.

मध्यरेल्वे मार्गावर अंबरनाथ आणि वांगणीच्या दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले होते. वांगणी स्टेशनवर फलाटावर पाणी आले होते. दरम्यान वांगणी आणि बदलापूरच्या मध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली. जवळपास दोन हजार अधिक प्रवासी गाडीतच अडकून पडले त्यामुळे एन डी आर एफ च्या तुकडीला पाचारण करण्यात आले. मध्यरेल्वे मार्फत सामाजिक संस्थाना मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
गाडी नदीच्या जवळच असल्यानं बचावकार्यात अडथळे येत आहेत. पाण्याची पातळी वाढतच असून पाणी गाडीत शिरण्याची चिन्हे असल्यानं प्रवासी घाबरून गेले आहेत.
वांगणीतील रेल्वे रुळांवर दोन फुटांपेक्षाही जास्त पाणी साचल्यानं महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. या गाडीत सुमारे २ हजार प्रवासी असल्याचं समजतं. रेल्वे प्रशासनानं तातडीची मदत मागितल्यानंतर मुंबईतून एनडीआरएफचे ४० जणांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांच्यासोबत ५ बोटी आहेत. मात्र, रस्त्यांवरही पाणी असल्यानं मदतीत अडथळे येत आहेत.

तसेच उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडून शहरात पाणी शिरलं आहे. कल्याणमध्ये वरप जवळ (पलेडीयाम शाळेजवळ) पेट्रोल पंपात पाणी शिरल्याने अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या तसेच पंपावरील कर्मचारी आणि नागरिक पेट्रोल पंपाच्या गच्चीवर आश्रित झाले आहेत. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पुणे याठिकाणी ही मुसळधार पाऊस होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रोहा आणि महाड शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणारे अनेक विमानं रद्द करण्यात आले आहेत तसेच मुंबई विमानतळावरून अनेक विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. एकंदरीत जल, रस्ते, रेल्वे आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
वांगणीतील रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनानं बदलापूर, कर्जत/खोपोली वाहतूक बंद केली आहे. लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौंड मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने पुढील चोवीस तासात अतिमूसळधार पर्जन्य वृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे. शाळांनी स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून सुट्टीचा निर्णय घ्यावा असे शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे.






