
यवतमाळ: प्रकाश आंबेडकरांनी यवतमाळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना आम्ही सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. यवतमाळमध्ये जनसभेला संबोधित करताना आंबेडकरांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. आयोग पक्षपातीपणे काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राजकीय पक्षांना पुलवामा हल्ल्यावर बोलू नका, अशी सूचना दिल्यावरुन आंबेडकरांनी आयोगावर घणाघाती हल्ला चढवला. ‘सत्ता मिळाल्यास त्यांना दोन दिवस तुरुंगात टाकू. कारण निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत नाही. भाजपाचा सहकारी पक्ष म्हणून त्यांचं काम सुरू आहे,’ असा आरोप त्यांनी केला. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमशी आघाडी केली आहे. आंबेडकर भारिपा बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या बहुजन वंचित आघाडीकडून सोलापूर आणि अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत. सोलापूरात त्यांच्यासमोर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचं आव्हान आहे.






