सफर शिकागोची: शिकागोतील राहाणीमान, जीवनशैली आणि बरेच काही (भाग २) – डॉ भास्कर धाटावकर – भाग 15

शिकागोतील जीवन शैली,राहाणीमान आणि बरेच काही..( भाग 2)

आता जीवनशैली विषयी म्हणायचे झाले तर ही बाब व्यक्तिसापेक्ष असते. प्रत्येकाची स्वतःची अशी लाइफ स्टाइल असते. ती अशीच का? किंवा तशीच का नाही हे प्रश्नच फिजूल ठरतात. पण येथे सातासमुद्रापार आलेले भारतीय तरुण मुले मुली खडतर मेहनत घेऊन, बुध्दीच्या कसोटीवर उतरून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने घेऊन काही स्काॅलरशिप मिळवून तर काहीजण प्रसंगी शिक्षणासाठी कर्ज घेऊन आपल्या ध्येयाप्रती पोचण्यासाठी आलेले असतात.

आता काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आणि स्टेट्स सिंबाॅल म्हणून युके,अमेरिकेत येऊन शिक्षण घेणारे आणखीन वेगळेच असतात आणि म्हणूनच येथे त्यांची जीवनशैली ,लाइफ स्टाइल ही व्यक्तिसापेक्ष असते.

ही तरुण मंडळी भरपूर मेहनत, कष्ट घेतात,खर्चाचा तालमेळ जुळवून घेण्यासाठी पार्टटाईम जाॅबही करतात. येथे श्रमाला प्रतिष्ठा आहे.कोणतेही काम कमी दर्जाचे समजत नाहीत कि मानत नाही.

आणखीन महत्त्वाची बाब म्हणजे घरातील सर्वच कामे स्वतःलाच करावी लागतात.नोकर चाकर ही संकल्पनाच येथे बाद झालेली आहे.कारण तासागणिक त्यांचे पेमेंट असते.सोमवार ते शुक्रवार पर्यंत दररोजच्या रूटीन प्रमाणे काम करत विकेंडलाच मित्रमंडळींबरोबर मौजमजा ,आऊटिंगला जाणे हा सुध्दा लाइफ स्टाइलचा एक भाग आहे.

मराठी भाषिक महाराष्ट्र मंडळात सहभागी होऊन आपल्या सणानुसार साजऱ्या होणाऱ्या स्नेहसंमेलनात भाग घेतात. जेणेकरून ते स्वतःलाच आपल्या संस्कृती,परंपरेशी जोडून घेण्यात आनंद मानतात.

तरुण मंडळी आपले शिक्षण पूर्ण करीत असतानाच जाॅबची संधी शोधतात.त्यात बरेच जण यशस्वी होतात. आयुष्याचा कारवाॅ चालूच राहातो आणि मराठी पाऊल पुढे पडते.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन