सफर शिकागोची: काही विचार ,काही आचार बाकी फक्त उपचार! – डॉ भास्कर धाटावकर – भाग 16

काही विचार ,काही आचार बाकी फक्त उपचार!

गेल्या येथील अनेक दिवासांच्या वास्तव्या नतंर, काही स्नेहांच्या घेतलेल्या गाठीभेटी , त्यांच्याशी विविध विषयांवर केलेल्या चर्चेतून येथे आलेल्या भारतीयांची आणि त्यातूनही मराठी माणसांची मानसिकता कशा प्रकाराची आहे किंवा झालेली आहे हा एक अभ्यासाचा भाग आहे.

या ठिकाणी माझी निरीक्षणे नोंदवीत आहे. कुठलीही टिकाटिप्पणी करण्याचा मुळीच हेतू नाही. कारण यामागे ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न आहे. तर सर्व साधारणत: नवीन कार घेतली कि मंदिरात नेऊन विधीवत पूजा करून पंडीतास दक्षिणा देणे, कार घेण्याच्या प्रीत्यर्थ मिठाई वाटणे तसेच नवीन घर विकत घेतल्यावर वास्तुशांती, पूजापाठ हे सारे विधी मायदेशा प्रमाणेच चालू असतात. येथेही पंडीत मंडळीना चांगलीच मागणी असते. हे पंडीत हिंदी, गुजराती इतकेच काय इंग्रजीतून सत्यनारायणाची पूजा सांगतात. आहे कि गंमत! आता काहीजण कॅसेटसवरही निभावून नेतात.

Indian Hotel in USA (India House – Chicago)

येथील भारतीय नागरिक शक्य तो भारतीय हाॅटेलांना अधिक प्राधान्य देतात. शेवटी आपल्याकडील पदार्थाची आठवण आल्याशिवाय राहात नाही मग अशी हॉटेल्स कुठे आहेत, तेथे कोणते पदार्थ मिळतात याचा शोध ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून घेतला जातो मग अगोदरच अ‍ॅडव्हान्स मध्ये टेबल बुकिंग केली जाते. ही हॉटेल्स सर्व प्रकारची उडपी,मद्रासी,साउथ कडील तसेच पंजाबी किंवा तत्सम हवेत त्याप्रकारची त्यांचा शोध घेतला जातो. काही रेस्टॉरंटवर इंडो पाक असेही बोर्डवर लिहिलेले असते. अशी हॉटेल्स उपलब्ध झाली कि आपल्या जिव्हातृप्तीचा समाधान होईपर्यंत आस्वाद घेतला जातो.

Shopping Malls in Chicago

माॅल्स संस्कृती आता जगभर पसरली आहे. भारतातही ती चांगलीच रूजली आहे तरीही अमेरिकेतील माॅल्सची भव्यता, विशालता आणि तेथील हव्या त्या त्या साहित्याची उपलब्धता काही औरच आहे. तासागणिक चालूनही तो आवाक्यात येत नाही. येथे काॅस्को, वाॅलमार्ट ,फर्निचरसाठी ऐक्य ,होम डेपो ,कपडेलत्ते जेंटस्, लेडीज, छोट्याची,मोठ्यांचे सर्वांचेंच अशा अनेक प्रकारच्या माॅल्समधून तुम्हाला ए टू झेड वस्तु एकाच छता खाली मिळतात. तीच बाब ग्रोसरी,भाजीपाळा,फिश,चिकन, पोर्क,बीफ जे पाहिजे असेल ते! आपण आपल्या ट्राॅलीत घ्यायचे, स्कॅनिंग करून पेमेंट डेबिट कार्ड किंवा कॅशनी करायचे. येथे कार्डचा वापर जास्त होतो.

कॅनडातील आणि अमेरिकेतील रस्ते, त्यावरून होणारी वाहतूक, रेल्वेमार्ग, त्यातही लोकल, पेट्रा, लाॅगेस्ट रूटच्या रेल्वेचा प्रवास आरामदायी असतो. लटकून जाण्याचे कौशल्य कोणालाच दाखविण्याची वेळ येत नाही. पण प्रत्येक जण आप-आपल्या खाजगी कार्सचा वापर करतात. ती येथील सर्वाधिक गरजच आहे. विमान सेवेचा प्रश्नच नाही. येथे पर्यटनास अधिकाधिक उत्तेजन दिले जाते.

Mode Of Transport in USA

अमेरिकेचे जागतिक महासत्तेचा जाणीव त्यांनी केलेल्या प्रगतीतून, कृतीतून आपणांस जाणवत राहाते. अजून बरेच काही सांगता येईल.

डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.