
मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच विराट कोहलीने पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियात सारं काही अलबेल असल्याचं सांगितलं. रोहित आणि माझ्यात बेबनाव असल्याच्या बातम्या कुठून आल्या हे माहीत नसल्याचंही त्यांनं स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेत विराटला रोहितबरोबरच्या बेबनावाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मी सुद्धा मीडियातूनच या गोष्टी ऐकल्या आहेत. मात्र टीम इंडियातील वातावरण अत्यंत चांगलं आणि खेळीमेळीचं आहे, एवढंच तुम्हाला सांगू शकतो. टीम इंडियात अलबेल नसतं तर वर्ल्डकपमध्ये आम्ही मोठा पल्ला गाठू शकलो नसतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम गेम असणं महत्त्वाचं असतं, याकडे लक्ष वेधतानाच टीम इंडिया आणि रोहितबाबतच्या मीडियातील सर्व बातम्या हास्यास्पद असल्याचं त्यानं स्पष्ट केलं.











