टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूला कांस्यपदक

भारताची स्टार बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने (P. V Sindhu) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज (01 ऑगस्ट 2021) झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत (Bronze Medal) सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा 21-13, 21-15 असा पराभव केला आहे. सिंधूचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले आहे. याआधी तिने रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. 

पहिल्या डावात सिंधूने बिंग जिओला संधी दिली नाही आणि आघाडी कायम ठेवली. पी व्ही सिंधूने पहिल्या डावात 21-13 असा विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये देखील सिंधूने 11-8 अशी आघाडी घेतली आणि अखेर ही बिंग जिआओला 21-15 अशा फरकाने पराभूत केले आहे. काल (31 जुलै) झालेल्या उपांत्य फेरीतील लढतीत सिंधूचा पराभव झाला होता. त्यामुळे सुवर्णपदकाची संधी हुकली होती. पण आज सिंधूने निराश न करता भारताला कांस्यपदक जिंकून दिले आहे.