ठाणे जिल्ह्यातील वेठबिगारी व बालमजुरी विरुद्ध श्रमजीवी संघटनेने केला संघर्ष….केली बालकांची मुक्तता

नगर जिल्ह्यातील मालकांवर गुन्हे दाखल

*जव्हार / भिवंडी -दि.20-* : गेले महिनाभर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेने मालक सावकारांची आणि मुलं खरेदी करून त्यांना राबवणाऱ्या धनगरांची पार दाणादाण उडवली आहे. या सावकारी वृत्तीच्या लोकांनी ठाणे, नाशिक, पालघर जिल्ह्यातील गरीब कातकरी मजुरांच्या दारिद्र्य आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या कोवळ्या बालकांना 500- 1000 रुपये देऊन अक्षरशः गुलाम म्हणून खरेदी केले होते.

नाशिक- नगर जिल्ह्यातील या घटना ताज्या असतानाच जव्हार येथील मुलगी आणि भिवंडी तालुक्यातील 2 मुलांना श्रमजीवी संघटनेने मुक्त केले असून तीन वेगवेगळ्या गुन्ह्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

मनिषा नरेश भोये व काळू नरेश भोये या धारणहट्टी, तालुका जव्हार येथील वय वर्षे 8 व 6 वर्षाच्या या मुली तळेगाव, तालुका अकोले अर्थात अहमदनगर जिल्ह्यातील येथे मेंढपाळ पुंडलिक कांदाडकर, देवराम कांदाडकर याच्याकडे बाल मजुरी करत होत्या. मनिषा 3 वर्षांपासून तर काळू 1 वर्षांपासून बाल मजुरी करत होती. मनिषाला पुंडलिक यांने दिनांक 17 तारखेला शिरपामाळ जव्हार येथे सोडले.

Rahul Pawar

या घटनेची माहिती श्रमजीवीचे रवींद्र वाघ यांना मिळताच संघटनेचे कार्यकर्ते या प्रकरणात पुढे आले. मनिषाच्या वडिलांना कांदाडकर यांनी मनिषाचे मजुरीचे वर्षाला 12 हजार आणि एक मेंढी असे ठरविले होते; परंतु सुरवातीला रू.500 व्यतिरिक्त काहीही दिलेले नाही. या मालकाने मनिषाला शेण भरणे , लेंड्या साफ करणे, दुध काढणे मेंढ्यांबरोबर फिरणे, पाणी आणणे, पाजणे मेंढ्या व गाईची सफाई करणे अशी अनेक कामे देऊन, राबवून घेतले.

Manisha Bhoye

याबाबत जव्हार पोलीस ठाण्यात श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराणे गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. यात मनीषाची बहीण काळू नरेश भोये ही अद्यापही बेपत्ता असून तिचाही शोध सुरु आहे. श्रमजीवी संघटनेचे रवींद्र वाघ, संतोष धिंडा, सोमनाथ भोये, सीता घाटाळ इत्यादिंनी या कुटुंबाला गुन्हा दाखल करणे कामी मदत तर केलीच. पण त्यांना तातडीने रेशनकार्ड मिळवून दिले.

 

*भिवंडीतील दोन बालकांनी घेतला मुक्त श्वास*

भिवंडीतील वडवली खोताचा पाडा येथील संगिता पवार या कातकरी महिलेने तक्रार दाखल केली आहे. राहुल नावाच्या आपल्या 17 वर्षीय मुलाला कर्जत तालुक्यातील ताजू येथील भिवा गोयकर या मेंढपाळाने वेठबिगार म्हणून ठेवले असल्याचे तीने सांगितले. मालक भिवा, राहुलला खूप त्रास शिवीगाळ करायचा, खूप कामे करून घ्यायचा अखेर मालकाच्या जाचाला कंटाळून राहुल घरी परतला. श्रमजीवी संघटनेने लहान मुलांच्या बांधबिगारीला पुन्हा एकदा उजेडात आणल्याने संगीता पवार हिने देखील पुढे येत मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी मधील वाफाळे सगपाडा येथील सीता रामू वाघे या कातकरी महिलेने देखील आपल्या 12 वर्षीय मुलाच्या अरुण वाघेच्या बालमजुरी आणि वेठबिगारीची तक्रार दिली आहे.

गरिबी आणि अज्ञान याचा गैरफायदा घेत संभाजी खताळ या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील मेंढपाळाने या 12 वर्षाच्या अरुणला मजूर म्हणून 500 रुपये देऊन एक प्रकारे विकत घेतले. तिकडे नेऊन या मुलाकडून कामं करून घेतली आणि जसे हे बालमजुरी, वेठबिगारी प्रकरण श्रमजीवी संघटनेने उजेडात आणल्यानंतर संभाजीने अरुणला घरी आणून सोडून दिले.

या दोनही प्रकरणात पडघा पोलीस ठाण्यात बालकामगार प्रतिबंधक अधिनियम 1986 आणि बंधबिगार पद्धतीने (उच्चाटन) अधिनियम 1976 तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ऍट्रॉसिटी) च्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले असून, पडघा पोलीस ठण्यात या पीडित कुटुंबासोबत श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते जया पारधी, केशव पारधी, आशा भोईर, मारुती भांगरे इत्यादी उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक (भाऊ ) पंडित यांनी स्वतः नगर नाशिक जव्हार इत्यादी ठिकाणच्या पीडित कुटुंबांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

गेले अनेक दिवस पंडित स्वतः या प्रकरणांकडे लक्ष ठेऊन आहेत. कातकरी कुटुंबं गरिबी आणि अज्ञानामुळे या अत्याचाराला बळी पडत आहे. म्हणूनच माझ्या सर्व कार्यकर्त्यांना कातकरी वाडी वर जाऊज कातकरी कुटुंबाचे अश्रू पुसण्याचे कामं करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.