
मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भ, कोकण आणि गोवा येथील तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार सरी कोसळू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा अंदाज आहे. गुरुवारी कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र येथे मुसळधार ते अती मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे. मुंबईत शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये या पावसाची उपस्थिती असेल, अशी शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि रायगडमध्ये गुरुवारसाठी दिलेला रेड अॅलर्ट कायम आहे. पालघर आणि ठाणे येथेही गुरुवारी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि रायगडमध्ये गुरुवारसाठी दिलेला रेड अॅलर्ट लक्षात घेता मुंबई, ठाण्यासह कोकणातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.






