उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का: बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला. एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या थापा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या असुन, उद्धव ठाकरेंसाठी हा एक धक्का मानला जात आहे. याचबरोबर बाळासाहेबांचे सेवेकरी असलेले मोरेश्वर राजे यांनीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून चम्पासिंग थापा हे ओळखले जातात. बाळासाहेब हे राज्यात दौरे किंवा सभेनिमित्त जायचे. त्यावे‌ळेस त्यांच्यासोबत थापा हे सावलीसारखे उभे असायचे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांना औषधे देणे आणि जेवण देणे अशी कामे ते करीत होते. मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ते ओळखले जायचे. बाळासाहेब यांच्या निधनानंतर थापा यांनी मातोश्रीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.