कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील नेत्यांना थेट इशारा

कर्नाटक सीमालगत असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्‍यातील गावातील समस्यांवरुन गावकरी आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आणखी एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला भेट देऊ नये, असा इशाराच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आज दिला. यावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफळला आहे.

सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात असलेली परिस्थिती पाहाता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी सध्या बेळगावला भेट देऊ नये, असा इशारा कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी रामदुर्ग तालुक्‍यातील सालहळी गावात पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली.

आपल्या राज्याच्या सीमेच्या पलीकडील जनताही आपलीच आहे. आपल्या राज्याच्या सीमेपलीकडील राज्यातील कन्नड शाळांचा विकास होत नाही. तेथील शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. आपल्या राज्याच्या सीमेच्या पलीकडील राज्यात असणाऱ्या कन्नड शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देणार आहे. कन्नड प्राधिकरणाच्या माध्यमातून शाळांना अनुदान देणार आहे. सोलापूर येथे कन्नड भवन उभारण्यासाठी दहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

जत तालुक्‍यातील कन्नड बांधवांना अनेक वर्षापासून पाण्याची समस्या भेडसावत होती. पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. महाराष्ट्र सरकारने जत तालुक्‍यासाठी पाण्याची योजना केली ती साकार होऊ दे. कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फॅक्‍सद्वारे संदेश पाठवला आहे. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असा संदेश पाठवला आहे. मागे देखील अशा तऱ्हेचे प्रयत्न झाले आहेत. त्यावेळी पूर्वी सरकारने जी उपाय योजना केली होती, तिच उपाय योजना सरकार करेल, असे बसवराज बोम्माई यांनी सांगितले.